रविवार, ५ मार्च, २०२३

पंचतारांकित

प्रिया तेंडुलकर — ८० आणि ९० च्या दशकांत दूरदर्शनच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं नाव. प्रख्यात लेखक आणि नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या अशीही यांची ओळख. जवळ जवळ १५ वर्षांपूर्वी बारावीच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या 'मॉडेलिंग आणि मी' या धड्यातून लेखिका म्हणून प्रिया यांची नव्याने ओळख झाली.

त्यानंतर 'पंचतारांकित' हे प्रिया याचं मी वाचलेलं पहिलं पुस्तक. हे पुस्तक वाचल्यानंतर प्रिया लेखिका म्हणून मला जास्त भावल्या. पुस्तकातील 'माझा मित्र', ''रजनी'चे दिवस' आणि 'पंचतारांकित' या लेखांतील प्रिया यांचे अनुभव मला विशेष आवडले. 

पुस्तकातला पहिलाच विजय तेंडुलकरांबद्दलचा 'माझा मित्र' हा लेख तेंडुलकरांचं प्रिया सोबतच मित्रत्वाचं नातं उलगडतो. "माझ्यावर फार अवलंबून राहू नकोस, स्वतःची स्वतः उभी रहा. स्वतःचे निर्णय स्वतःचा सारासार विचार करून घे. तू चुकणार नाहीस आणि चुकलीस तर हरकत नाही. सगळ्या चुकांना आयुष्याचे दरवाजे बंद केलेस तर सत्यालाही तू दरवाज्याबाहेर ठेवशील." आजपासून जवळ जवळ ४० वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलीला हा संदेश देणारे वडील समाजात क्वचितच असतील. या संस्कारांमुळे चाकोरीबाहेरचं आयुष्य प्रिया आत्मविश्वासाने, मिळालेल्या स्वातंत्र्याचा योग्य वापर करून स्वतःच्या टर्म्स वर जगू शकल्या. अभिनय आणि मॉडेलिंगसारख्या क्षेत्रांत स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करू शकल्या. 

शाळेतून नुकतीच कॉलेज मध्ये गेल्यानंतर भांडण करायची वेळ आल्यास अचानक रडू येऊन तोंडातून शब्दही न फुटणारी प्रिया, पंचतारांकित हॉटेलच्या मॅनेजरला खडे बोल सुनावणारी प्रिया, समाजाचा स्त्री कडे पाहण्याचा दृष्टकोन यामुळे अस्वस्थ होणारी प्रिया, असे प्रिया यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पुस्तक वाचताना वाचकाला समजतात. 

महाराष्ट्रीयन मध्यमवर्गीय कुटुंबात वाढताना झालेले संस्कार, सतत काळजी करणारी आई आणि वडीलांच्या रुपात मिळालेला मित्र, त्यामुळे केलेली धाडसं, असे सगळे अनुभव प्रिया यांनी अतिशय प्रामाणिकपणे आपल्या लेखातून मांडले आहेत, म्हणूनच एक वाचक म्हणून ते मनाला खोलवर भिडतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा