बुधवार, १ मार्च, २०२३

आठवणींचा खजिना - पुस्तकांचा कप्पा

 


लहानपणापासून वाचनाची सवय जडण्याचं श्रेय आई बाबांइतकंच मराठीच्या पाठ्यपुस्तकांनाही जातं. शाळेत असताना पाठ्यपुस्तकातला एखादा धडा किंवा कविता आवडली की वाचनालयात पुस्तक बदलून घेण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली जायची. पुस्तक वाचण्यासाठी स्वतःचा नंबर आला की एकदाचा जीव भांड्यात पडायचा. 

शाळेच्या वाचनालयात उपलब्ध नसलेल्या पुस्तकांसाठी मात्र उन्हाळ्याच्या सुट्टीपर्यंत वाट पाहावी लागायची. कारण उन्हाळ्याच्या सुट्टीच्या सुरुवातीला वर्षभर खाऊचे पैसे साठवलेला गल्ला (piggy bank) फोडण्याचा विशेष कार्यक्रम घरात असायचा. त्यात साठलेल्या पैशांतून एक ठराविक रक्कम बाजूला काढली जायची. त्यानंतर दादरला 'आयडियल' किंवा 'मॅजेस्टिक' मध्ये जाऊन पुस्तक खरेदी व्हायची. भर दुपारी बाहेर हुंदडण्याऐवजी मला शांतपणे पुस्तक वाचताना पाहून घरचेही सुटकेचा निःश्वास सोडत. 

सुट्टी संपवून शाळा सुरू झाल्यानंतर वाचलेल्या पुस्तकांबद्दल मैत्रिणींच्या गप्पा रंगायच्या. कधीतरी पुस्तकांची अदलाबदलही व्हायची.

पुढे शाळा-कॉलेज संपलं. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात पुढे गेला. आता फोनवर कधीतरी बोलणं होतं, पण त्यात पूर्वीसारख्या पुस्तकांच्या गप्पा होण्याईतपत निवांतपणा नसतो. 

कोविडच्या काळात work from home च्या निमित्तानं पुन्हा गावच्या घरी राहायला मिळालं. फावल्या वेळात खोली आवरण्याच्या निमित्ताने अनेक वर्ष बंद असलेला पुस्तकांचा कप्पा पुन्हा उघडला गेला. इतकी वर्ष दूर गेलेले पुस्तकरुपी दोस्त पुन्हा गवसले. अधाशासारखं अतिप्रिय पुस्तक पुनः श्च वाचायला घेतलं. शाळेत असताना जगाचा अनुभव नसताना वाचलेली कथा, जगाचा थोडाफार अनुभव आल्यानंतर वाचताना अधिक जवळची वाटली. या आधी पुस्तक वाचताना काहीतरी राहून गेलेलं, अचानक उमगल्यासारखं वाटलं. पाठ्यपुस्तकातला धडा पुस्तकात पुन्हा वाचताना मन पुन्हा शाळेतल्या मराठीच्या तासात रमलं. मराठीच्या तासाची आतुरतेने वाट पाहणारे चेहरे पुन्हा डोळ्यासमोर आले. विषय मनापासून शिकवणारे, अवांतर वाचनासाठी प्रोत्साहन देणारे गुरुजन आठवले. या पुस्तकांच्या रुपात आठवणींच्या अत्तराची कुपी अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा उघडली आणि शब्दात वर्णन न करता येण्याजोगा आनंद देऊन गेली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा