शनिवार, १८ मार्च, २०२३

डॉ. आयडा स्कडर - वीणा गवाणकर



नेहमीच्या कथा, कवितांपेक्षा काहीतरी वेगळं वाचायचं म्हणून आईचा पुस्तकांचा खण धुंडाळतना वीणा गवाणकर लिखित डॉ. आयडा स्कडर हे पुस्तक मिळालं. मुळात वेळुर हे गाव भारताच्या नकाशावर कुठे येतं हे ठाऊक नसलेल्या मला डॉ. आयडा स्कडर हे नाव माहीत असणं शक्यच नव्हतं. त्यामुळे केवळ या नावाबद्दलच्या कुतूहलापोटी हे पुस्तक मी वाचायला घेतलं. 

स्वानुभवांतून माणूस घडतो असं म्हणतात, परंतु डॉ. आयडा स्कडर यांना आलेल्या अनुभवांतून मात्र दक्षिण भारतातील वैद्यकीय सेवेचा चेहरामोहराच बदलला, असं म्हणाल्यास अतिशयोक्ती ठरू नये. 

'अर्काट मिशन' या अमेरिकन मिशनरीसाठी भारतात काम करणाऱ्या अमेरिकन कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीत आयडा यांचा जन्म झाला. अमेरिकेत स्थायिक होऊन सुखाने संसार करत आयुष्य जगण्याची स्वप्न पाहणाऱ्या आयडा यांचं आयुष्य भारतात आलेल्या एका अनुभवाने पूर्णपणे बदललं. केवळ पुरुष डॉक्टर नको म्हणून एकाच रात्रीत तीन भारतीय स्त्रियांना आलेला हकनाक मृत्यू आयडा यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेला. त्यामुळेच वयाच्या तिशीत अमेरिकेतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून त्या सेवा देण्यासाठी भारतात परतल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात डॉक्टर म्हणून काम करणं सोपं नव्हतं. अमेरिकेत वैद्यकीय अभ्यासक्रमात न शिकवलेल्या भारतीय रोगांवर ईलाज करण्याचं आव्हान पेलतानाच भारतातील अपुऱ्या वैद्यकीय सेवा, गरिबी, जातव्यवस्था, स्वच्छतेबाबतचं अज्ञान, जाचक रूढी-परंपरा, अंधश्रद्धांचा घट्ट पगडा यांचा सामनाही त्यांना करावा लागत होता. तरीही हार न मानता त्यांनी आपलं कार्य अखंडित सुरू ठेवलं. १०x१२ च्या एका खोलीतून सुरू झालेला प्रवास अनेक आव्हानांना सामोरं जात पुढे अनेक वर्ष सुरू राहिला. गावोगावी फिरता दवाखाना चालवून लाखों रुग्ण तपासत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन निधी उभारणी करणे, नवीन सहकारी या कार्यात जोडणे, अशी अनेक आव्हानं डॉ. आयडा यांनी समर्थपणे पेलली. पहिल्या महायुद्धाचा काळ, प्लेग सारख्या रोगाचा फैलाव, आर्थिक चणचण यांना सामोरं जाताना येणाऱ्या निरशेवर मात करून, काही वेळा आलेल्या अपयशातून मार्ग काढत डॉ. आयडा यांनी आपलं कार्य अखंडपणे सुरू ठेवलं. त्यातूनच पुढे मेरी टॅबर शेल मेमोरियल रुग्णालय, नर्सिंग स्कूल, युनियन मिशनरी स्कूल फॉर विमेन आणि ख्रिश्चन मेडिकल कॉलेज यांची स्थापना केली. 

Google वर शोधल्यास भारतातील अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालयांच्या यादीत ख्रिश्चन मेडिकल कॉलेज आजही पहिल्या पाचात येतं. असं असूनही डॉ. आयडा स्कडर हे नाव भारतीयांना आजही फारसं परिचित नाही. 

आयुष्यभर भारतातील लोकांसाठी त्यांच्या निरामय आयुष्यासाठी आपलं अवघं जीवन अर्पण करणाऱ्या डॉ. आयडा यांचं चरित्र वीणा गवाणकर यांनी उत्तमरीत्या शब्दबध्द केलंय. या विषयावर संशोधन करताना त्यांनी घेतलेले कष्ट आणि आलेल्या अडचणींवर मात करून त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक वाचकांसाठी मोलाची भेट आहे, त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा