रविवार, १७ ऑगस्ट, २०१४

प्रिय ताई आजीस...

स्व. ताई आजीस,
सप्रेम नमस्कार,

काही दिवसांपूर्वी मी आपल्या गावच्या घरी गेले होते. तुझ्या जाण्यानंतरही अण्णांनी घर अगदी जसंच्या तसं जपलंय. पण कुठेतरी तुझं नसणं आम्हा सर्वांनाच जाणवतंय. घरी असताना  मला सतत वाटत होतं की कुठल्यातरी खोलीतून तू अचानक बाहेर येशील आणि मला जवळ घेऊन नेहमीसारखे माझे खूप लाड करशील, पण आता असं कधीच होऊ शकणार नाही याची जाणीव मला झाली आणि मी स्वतःला सावरलं.

संध्याकाळी मी सहजच झोपाळ्यावर बसले होते. मंद वारा वाहत होता. सगळीकडे शांतता होती. मनात मात्र तुझ्या अनेक आठवणींनी गर्दी केली होती. माझ्या लहानपणीपासूनच्या तुझ्याशी जोडल्या गेलेल्या अनेक आठवणी एखाद्या चित्रपटाप्रमाणे डोळ्यांसमोर झरझर येत होत्या. तसं पाहायला गेलं तर तू माझ्या बाबांची आत्या. पण आपलं नातंच जगावेगळं होतं. तुझ्याशी गप्पा मारताना, तुझ्यासमोर स्वतःचे विचार मांडताना मला कधीही भीती किंवा परकेपणा जाणवलाच नाही. आई-बाबा घरी नसताना मला हक्काने स्वतःच्या घरी ठेवून घेणारी, माझं जेवण, अभ्यास यांच्याकडे काटेकोरपणे लक्ष देणारी, माझ्यासोबत खेळायला कुणीच नसलं की मला समुद्रावर फिरायला घेऊन जाणारी, दादा-ताईसाठी बनवलेल्या खाऊमध्ये माझा वाटा न चुकता काढून ठेवणारी, आईला कामावरून घरी यायला  उशीर झाला की तिला जेवणाचं गरमागरम ताट वाढून देणारी तू, माझी ताई आजी. तुझ्या या आणि अशा अनेक आठवणींची शिदोरी घेऊन मी घरी परतले.

मला  लहानाचं मोठं करण्यात, माझ्यावर चांगले संस्कार करण्यात तुझा सिंहाचा वाटा आहे. गेली  आठ वर्ष तू अर्धांगवायूसारख्या आजाराशी धीराने लढत होतीस. मागच्या आठ वर्षांपासून तू आजारी होतीस, आमच्याशी नीट बोलूही शकत नव्हतीस. पण तुझं असणं हा आमच्यासाठी भक्कम आधार होता. तुझं  देवाघरी जाणं मी अजूनही पचवू शकले नाहीये. खूप पोरकं झाल्यासारखं वाटतंय. माझ्या मनात एकाच खंत आहे की माझ्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणाऱ्या माझ्या ताई आजीसाठी मी मात्र काहीच करू शकले नाही.

ताई आजी, तुझी शिकवण मी आयुष्यभर  लक्षात ठेवेन आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करेन. तुझे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत राहू दे.


तुझीच,
तन्वी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा