सोमवार, ४ नोव्हेंबर, २०१३

आठवणीतली दिवाळी...

 
दरवर्षी दिवाळी जवळ आली ना की मला माझ्या बालपणीचे दिवस आठवू लागतात. कधी एकदा सहामाही परीक्षा संपते आणि सुट्ट्या सुरु होतात, याची आम्ही बच्चेकंपनी आतुरतेने वाट पाहात असू. शहरात  राहणारी  चुलत- मावस- आत्ये- मामे भावंडेही यावेळी गावी येत असत. दिवाळीच्या सुट्टीत गावामधल्या प्रत्येक आळीचं गोकुळात रुपांतर होत असे. 

सुट्ट्यांमध्ये आम्ही बच्चेकंपनी दररोज सकाळी नाश्ता झाल्यानंतर क्रिकेट खेळण्यासाठी एकत्र जमायचो. त्यावेळी दोन गटांत उत्तम खेळाडू निवडण्यासाठी रंगणारी चढाओढ, रंगात आलेल्या खेळाची एखाद्या दादा- ताईने केलेली रंजक कॉमेंट्री , हरवलेला चेंडू शोधण्यासाठी केलेली धावपळ आणि खेळ थांबू नये म्हणून नवीन चेंडूची व्यवस्था करण्यासाठी केलेली लगबग या सर्वामध्ये आम्ही रमून गेलेलो असायचो आणि सूर्य डोक्यावर कधी आला याचं कुणालाच भान नसायचं. घराघरांतून प्रत्येकाला जेवणासाठी हाका येऊ लागल्या की मात्र आमची पांगापांग व्हायची. 

दुपारी जेवणं झाली की पुन्हा  आम्ही बच्चेकंपनी बैठे खेळ खेळण्यासाठी सज्ज व्हायचो. आमच्या आळीत सार्वजनिक वर्गणी काढून सर्वांना खेळण्यासाठी कॅरम, बुद्धिबळ, सापशिडी, पत्ते अशा खेळांच्या सामानाची चोख व्यवस्था असायची. कुणाचीतरी मोठ्ठी ओसरी निवडून दुपारभर आळीपाळीने आम्ही हे खेळ खेळायचो. कधीतरी तेच-तेच खेळ खेळून कंटाळाही यायचा. मग बदल म्हणून नाव- गाव- फळ- फूल किंवा गाण्यांच्या, नावांच्या भेंड्याही खेळल्या जायच्या. खेळताना आमच्यात कधीतरी भांडणही व्हायची. पण ती क्षणिक असायची. कधी कुणी घरी जाऊन मोठ्यांकडे तक्रार केली तरी कुणी फारसं मनावर घ्यायचं नाही. 

दिवाळीचे चार दिवस सोडून इतर दिवशी संध्याकाळी आम्ही समुद्रावर जायचो. समुद्राच्या पाण्यात मनसोक्त खेळायचो. दिवाळीच्या चार दिवसांत मात्र प्रत्येकजण आपापल्या घरी मोठ्यांच्या कामात हातभार लावत असे. रांगोळी काढायला ताईला मदत करणे, पणत्यांनी संपूर्ण अंगणाची रोषणाई करणे आणि फराळावर ताव मारणे ही आम्हा बच्चेकंपनीची आवडती कामं. रात्री फटाके उडवणं हा आमच्यासाठी एक अविस्मरणीय सोहळा असायचा. फटाक्यांचा आनंद लुटत असतानाच ते चार दिवस पुरवून पुरवून वापरायचे आहेत याची जाणीव असायची. 

पाहता पाहता सुट्टीचे १५- २० दिवस कसे भुर्रकन उडून जायचे कळायचंसुदधा नाही. शहरातून गावी आलेली भावंडं उन्हाळ्याच्या सुट्टीत अजून जास्त दिवसांसाठी राहायला येऊ अशा आणा-भाका घेऊन आपापल्या घरी परतायची. 

आम्ही जसजसे मोठे झालो तसं  शिक्षण नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेलो. शहरातल्या भावंडांचंही  गावी येणं  कमी होत गेलं. पण आजही एखाद्या समारंभात एकत्र जमलो कि बालपणीच्या रम्य आठवणींची पारायणं  करण्यात २-३ तास अगदी सहज निघून जातात. बालपणीचे ते दिवस कित्ती अमुल्य होते, याची मग जाणीव होते आणि अलगद डोळ्यांत पाणी येते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा