शाळेत असताना ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कादंबरीचं नाव, या प्रश्नाचं उत्तर म्हणून ‘ययाति’ आणि ‘वि. स. खांडेकर’ या नावांशी माझा संबंध आला होता. काही दिवसांपूर्वी सहजच amazon.com वर मराठी पुस्तकं शोधत असताना ‘ययाति’चं मुखपृष्ठ नजरेस पडलं. एकंदर पौराणिक पार्श्वभूमी आणि ४०० च्या जवळपास पृष्ठसंख्या यांमुळे ही कादंबरी आपल्याला पेलवणार की नाही, याचा अंदाज येत नव्हता. तरीही मी ही कादंबरी विकत घेण्याचं ठरवलं. कादंबरी हातात घेण्याआधी goodreads.com वर वाचकांची विश्लेषणं वाचल्यानंतर मात्र मी बऱ्यापैकी सकारात्मक झाले.
‘ययाति’ वाचायची सुरुवात मी
मलपृष्ठावरील (backcover) सारांशापासून केली. त्यामुळे कथेची पार्श्वभूमी समजणं
अधिक सोपं झालं. या कथेच्या पौराणिक संदर्भांबद्दल काहीही कल्पना नसल्यामुळे मी ही
कादंबरी एका गोष्टीप्रमाणे वाचण्याचं ठरवलं. ‘ययाति’ इसवी सन १९५० च्या दशकात
लिहिली गेली असल्यामुळे ‘युयुत्सु’, ‘रुदन’ असे काही मराठी शब्द माझ्या वाचनात
पहिल्यांदाच आले. अशावेळी आई आणि मराठी शब्दकोश माझ्या मदतीला धावून आले.
कादंबरी वाचताना कथा जसजशी
पुढे सरकत होती तशी एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, कादंबरीचं नाव जरी ‘ययाति’
असलं तरीही ही गोष्ट एकटया ययातिची नाही. ययातिच्या अवतीभोवती असण्याऱ्या प्रत्येक
पात्राची ही कथा आहे. वि.स.खांडेकरांनी कथेतील प्रत्येक पात्राची एकमेकांशी
घातलेली सुरेख गुंफण उत्तरोत्तर ही कथा खुलवत जाते. ययाति सारखा महान राजा परिस्थिती
हाताबाहेर गेल्यामुळे हतबल होऊन व्यसन आणि वासनेच्या आहारी गेला. ॠषिकुळातील कचाने
मात्र शुक्राचार्यांनी संजीवनी विद्येचा चालवलेला गैरवापर थांबविण्यासाठी शूर योद्ध्याला
लाजवेल असं धाडस केलं, कर्तव्यापुढे स्वतःच्या प्रेमाचा त्याग केला. ॠषिकुळातील
देवयानी हस्तिनापुरची पट्टराणी बनली खरी, पण अहंकारापायी संसारसुख गमावून बसली. याउलट
दासीपद स्वीकारलेली राजकन्या शर्मिष्ठा मात्र अनेक हालापेष्टा सोसूनही संतुष्ट झाली.
‘ययाति’ची कथा काल्पनिक जरी असली तरी आज एकविसाव्या शतकातही यातील प्रसंगांतून खूप काही शिकण्यासारखं आहे. ही कथा वाचताना त्यांतील पात्रांचे स्वभावविशेष कमीअधिक प्रमाणात आपल्या आजूबाजूला घेऊन वावरणारी माणसं आपल्या डोळ्यांसमोर तरळून जातात. एक समाधानी आयुष्य जगण्यासाठी संयम, क्षमाशीलता आणि स्वतःच्या दोषांवर केलेली मात यांना पर्याय नाही, हे आपल्याला पटत जातं. स्वतःतील दोष, अहंकार यांना वेळीच वेसण घातली नाही तर ते स्वतःसोबतच आपल्या प्रियजनांच्या दु:खासाठी देखील कारणीभूत ठरतात. पाप-पुण्य, शाप-वर या संकल्पनांच्या पलीकडे जाऊन मनुष्यस्वभाव आणि कर्म यांचा मनुष्याच्या नशिबाशी किती जवळचा संबंध आहे, याची
कल्पना 'ययाति' वाचताना येते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा