शनिवार, २३ एप्रिल, २०२२

थेंबातलं आभाळ - भाग 1


प्रवीण दवणे लिखित या लघुकथा संग्रहाचे ‘थेंबातलं आभाळ’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या संग्रहातील कथा जरी दीड-दोन पानी असल्या तरीही वाचकाला त्या विचारमग्न होण्यास भाग पाडतात. या संग्रहातील कथांचं स्वरूप हे प्रामुख्याने स्व-अनुभवांवर आधारित असलं तरी समाजातील चालीरितींवर आणि समाजातील काही गंभीर मुद्द्यांकडे त्या वाचकांचं लक्ष वेधून घेतात. त्याचप्रमाणे काही हलकेफुलके अनुभव वाचकाला सुखावून जातात.

पुस्तकातील सर्वच लेख वाचनीय परंतू ‘प्रश्नांच्या भोवर्यातली लोकशाही’ हा मला विशेष आवड्लेला लेख. हा संग्रह प्रकशित होऊन जवळजवळ 17 वर्षांचा काळ लोटला असला तरीही भारतीय लोकशाहीची परीस्थिती मात्र फारशी बदललली नाही, या विचारानेच मन अस्वस्थ होते. “आता तर आपापल्या कर्तृत्वाने सगळेच एकसारख्या चेहेर्याचे झाले आहेत, की कोण या देशाचा वाली हेच कळेनासं झालंय. तरीही मतदानाचा हक्क बजावायचा आहे. पण मत देताना, बटण दाबताना हात थरथरणार आहेत – तन घुटमळणार आहे. ज्या हाती माझा सुजलाम् सुफलाम् देश मी देतो आहे, ते हात खरचं या मातेचे पुजारी आहेत की शिकारी? कुणास ठाऊक!” या ओळी वाचताना भारतमातेचा एक सुजाण नागरिक म्हणून डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहात नाही. त्याचप्रमाणे ‘अख्ख्या बिस्कीटाच्या पुड्यातली गम्मत’, ‘यांचं होणार कसं’, भाषेचा शिक्षक’ आदि लेखांतून भावी पिढीची श्रद्धास्थानं, विचार, बेफिकीर वृत्ती यामुळे एका संवेदनशील शिक्षकाची होणारी तळमळ वाचकाला लख्खपणे जाणवते. संग्रहातील पु.ल.देशपांडे, मा. अटल बिहारी वाजपेयी आणि लतादीदींबद्दलचे आठवणीरूपी लेखही सुखद!

‘थेंबातलं आभाळ’ हा कथासंग्रह म्हणजे प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा पुस्तकरूपी संस्कारवर्ग असे म्हणल्यास अतिशयोक्ती ठरू नये!