रात्रीची जेवणं उरकून वाचायला बसले. वेळ कशी भराभर निघून गेली समजलंच नाही. भिंतीवरच्या घड्याळाकडे लक्ष गेलं, जवळ-जवळ रात्रीचे दोन वाजले होते. आता मात्र वाचन आवरतं घ्यायला हवं याची जाणीव झाली. झोपायला जाण्यासाठी उठत असतानाच स्टडीरूममधील भिंतीत असलेल्या जुन्या कपाटाकडे अचानक माझी नजर वळली. कितीतरी वर्षांत मी ते कपाट उघडलं नव्हतं. त्या कपाटात माझ्या आजोबांची आणि आईची अनेक पुस्तकं आहेत, हे मला ठाऊक होतं. मला वाचण्यासाठी पुस्तकांचा खजिना सापडतोय का, या कुतूहलापोटी मी ते कपाट उघडलं आणि एकामागोमाग एक अशी बरीचशी पुस्तकं माझ्या हाती लागली. माझ्या "to read" यादीमाधली बरीचशी पुस्तकं मला माझ्याच घरात सापडली होती. सुनीताबाई देशपांडे यांचं 'आहे मनोहर तरी', पु. ल. देशपांडे यांची 'जावे त्यांच्या देशा' व 'नस्ती उठाठेव' आणि गौरी देशपांडे यांची 'मुक्काम' कादंबरी ही पुस्तकं अगदी उत्साहाने मी कपाटाबाहेर काढली. गम्मत म्हणजे त्या कपाटात माझीही लहानपणीची गोष्टींची काही पुस्तकं आईने जपून ठेवली होती. भिंतीमधलं ते पुस्तकाचं जुनं कपाट एकाच घरातल्या तीन पिढ्यांची वाचनसंपदा आपल्या पोटात घेऊन बसलं होतं. काही पुस्तकं सहज चाळत असताना मला त्यावर नाव आणि पुस्तक घेतल्याची तारीख टिपून ठेवलेली दिसली आणि पुस्तकांवर नाव आणि तारीख घालण्याची माझी सवय मला कुठून लागली असावी, याचा उलगडा झाला.
लहानपणी 'बार्बी डॉल' हवी म्हणून हट्ट करणाऱ्या मला माझ्या आईने हातात गोष्टींची पुस्तकं दिली. शाळेत चांगले मार्क मिळवून पास झाल्यावर आजोबांनी भेट दिलेलं 'श्रीमान योगी', कात्रजचं सर्पोद्यान पाहून झाल्यावर बाबांनी घेऊन दिलेलं 'भारतीय साप' याबरोबरच विविध विषयांवरची पुस्तकं आजही माझ्या बुकशेल्फ मध्ये जपून ठेवलेली आहेत, आणि मी ती वाचलीत. आजही जमेल तसं मी काही ना काही वाचत राहण्याचा प्रयत्न करते. पुस्तकांनी मनोरंजनाबरोबरच मला विचार करायला शिकवलं, स्वतःचे निर्णय स्वतः घेताना मानसिक बळ दिलं आणि प्रसंगी नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी मदतही केली.
मागची पिढी आपल्या भावी पिढीकरिता कोणत्या ना कोणत्या स्वरूपात वारसा ठेवून जाते. माझ्या मागच्या पिढीकडून मला मिळालेला अमूल्य ठेवा म्हणजे वाचनसंपदा. लहानपणीच मला लावलेल्या वाचनाच्या या चांगल्या सवयीबद्दल मी माझ्या आई-बाबांची आणि विशेषतः माझ्या आजोबांची आजन्म ऋणी असेन.
